चांगली वागणूक, सत्संग तसेच भक्ती म्हणजे काय, तर माझ्या मते आसक्तीपासून विरक्त होऊन शाश्वत सत्याबाबत संपूर्ण आस्था ठेवणे म्हणजेच भक्ती होय. सर्वोत्तम सुखाची लालसा सर्वांनाच असते; परंतु तसे सुख प्राप्त करण्यासाठी सत्कर्माचे मूल्य चुकवावे लागते. त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्या व्यक्तिगत शुद्धीची साधना करावी लागते. जसे चुकीच्या मार्गाने घरात पैसे आणणार नाही, बेइमानी करणार नाही, कोणालाही फसवणार नाही, वेळ पडल्यास चटणी-भाकरी खाईन; पण खोट्या श्रीमंतीची शान मिरविण्यासाठी भ्रष्टाचार करणार नाही, स्वाभिमानाने जगेन, अशा व्यक्तिगत शुद्धतेची प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे.
असे म्हणतात, सुगंधित विचारांच्या शरीराची एक अत्तरदाणी घरात असली, तर अवघे घर सुगंधमय होते. कुटुंबप्रमुखात जर आदर्शाची बीजे रुजली, तर घर तसेच संपूर्ण परिसरावर त्याचा चांगला परिणाम होतो. अशाच प्रकारे सत्कर्माने आणि सत्संगाने परिपूर्ण असलेल्या आर. डी. धस यांच्या घरातील लोकांचा मला स्वतःला जो अतिशय आनंद देणारा अनुभव आला, त्यास तोड नाही. त्याची ही कथा ः मी माझ्या गार्डन फ्लॅटच्या गार्डनचे नूतनीकरण करण्याचे ठरवून सप्टेंबर- ऑक्टोबर 2011 ला काम सुरू केले होते. त्यासाठी आणलेल्या सामानाचे आणि मजुरीचे पैसे चुकते करण्यासाठी मी आमच्या घराजवळच असलेल्या बॅंकेच्या एटीएममधून 3-10-11 ला 15 हजार रुपये काढले. त्याच वेळी मला माझ्या घरून मोबाईलवरून सांगण्यात आले की, ""तुम्हास भेटण्यासाठी दोन सद्गृहस्थ आलेले आहेत, तर लवकर घरी या.''
अशा प्रकारची सूचना मिळाल्यामुळे मी ते पैसे (पंधरा हजार. एक हजाराच्या पंधरा नोटा) माझ्या मनीपर्समध्ये नीट ठेवले. पर्समध्ये अगोदरचे 250 रुपये होते. असे एकूण 15 हजार 250 रुपये असलेले पाकीट मी व्यवस्थित बंद केले व घाईघाईने घराकडे निघालो. घराकडे जाताना ते पाकीट पॅंटच्या खिशात ठेवण्याच्या प्रयत्नांत असताना ते आत न जाता रस्त्यावर पडले; परंतु मी घाईघाईने जात असल्यामुळे ही गोष्ट माझ्या लक्षातही आली नाही. मी घाईघाईने घरी आलो. आलेल्या पाहुण्यांशी वार्तालाप झाला. त्यांच्या कामाची पूर्तताही केली. या सर्व गोष्टींमध्ये जवळ जवळ अर्धा तास गेला असेल. तरीही मला माझी मनीपर्स हरवल्याची कल्पनाही नव्हती.
आणि ह्याच वेळी आनंद देणारी घटना घडली. मला एक फोन आला. त्यावर त्यांनी विचारले, ""काका तुमचे काही हरवले आहे काय?'' आवाज तर अनोळखी वाटत होता, असे का विचारले याचे आश्चर्य वाटले आणि त्याच वेळी मी माझ्या पॅंटच्या खिशात चाचपडून पाहिले आणि त्यामुळे काय झाले ते लक्षात आले. मी त्यांना माझे पैशाचे पाकीट हरवल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मला त्यांचा घरचा पत्ता सांगून त्यांच्या घरी बोलावले. मी जवळ जवळ पळतच त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्यांनी सर्व खुलासा केला. त्यांचा मुलगा ओंकार धस मोटारसायकलवरून घरी येत असताना त्याला ते रस्त्यावरचे पाकीट दिसले. त्याने ते पाकीट घेतले व घरी जाऊन आई-वडिलांच्या समक्ष ते उघडून बघितले. त्यातील इतकी मोठी रक्कम पाहून त्यांच्या सुसंस्कारित मनास वाटले, की ज्या व्यक्तीचे हे पैसे असतील त्यांची मनःस्थिती काय झाली असेल, असा विचार करून त्यांनी पाकिटात असलेल्या माझ्या कार्डावरील फोन नंबरवर फोन करून माझी अनामत घेण्यासाठी घरी बोलावले. धन्य त्याचे आई-वडील आणि चि. ओकार. मी त्या सर्वांचे खूप आभार मानले. त्यांना पेढेही दिले. अशा कुटुंबाचे मी खूप आभार मानतो आणि त्यांची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करतो
No comments:
Post a Comment