Friday, 31 July 2015

गुरु सद्गुरु आणि अहंकार शुन्यत्व


मानवी जीवनाच्या जडण-घडणीत आणि सार्थकतेत सद्गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. जीवन जगताना दररोजच्या व्यवहारात आपल्याला अनेक गुरू भेटतात. व्यावहारिक गुरू हे वस्तुजन्य सुखाची वाट दाखवतात, तर सद्गुरू मात्र शिष्याला त्याच्याच अंतःकरणात वास करणार्‍या त्या चैतन्याची ओळख करून देतात. आत्मविश्वासपूर्वक स्वशक्तीनुसार जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखवतात… आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त विशेष लेख…
गुरू-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीमधील एक महान परंपरा आहे. त्याचे प्रतिक म्हणून आषाढ पौर्णिमेला आपण गुरू पौर्णिमा साजरी करीत असतो आणि तो दिवस यावेळी ३१ जुलै रोजी आहे. मातृदेवो भवः, पितृदेवो भवः व आचार्य देवो भवः असे आपण म्हणतो. आई-वडील यांच्यानंतर जीवनाला आकार देणारा श्रेष्ठ मार्गदर्शक या नात्याने आपण गुरू या शब्दाकडे पाहतो. गुरूचे माहात्म्य सांगताना कबीर म्हणतात- ‘गुरू गोविंद दोई खडे, काके लागू पाय?’ गुरू आणि परमात्मा दोघेही समोर उभे आहेत. मी कुणाच्या पाया पडू? कबीरजी गुरूंच्याच पाया पडावे कारण- ‘बलिहारी गुरू आपकी, जो गोविंद दियो बनाय’. गुरूमुळे मला परमात्म्याचे दर्शन झाले म्हणून गुरू मोठे, असा मतितार्थ हा रूढार्थ लक्षात घेतला तर गुरू आणि ज्ञान यांचा संबंध स्पष्ट होतो. आपण ज्ञानाने शिकतो, असे आपणास वाटते. मात्र, मानसशास्त्र असे सांगते की आपण समर्पणाने शिकत असतो आणि मेंदूने आपण फक्त ग्रहण करतो.
‘विद्या विनयेन शोभते’ असे आपण एक सुभाषित ऐकले आहे. विनय म्हणजे नम्रता किंवा समर्पण प्रतिकारामुळे (रेझिस्टन्स) आपल्या विद्या शिकण्याला अडथळा येतो. अहंकारामुळे प्रतिकार निर्माण होतो व आपले शिकणे बाजूला राहते. अशा वेळी आपल्याला कळत नसते व दुसर्‍याला कळते हेही आपल्याला कळत नसते; पण समर्पण, नम्रता असेल तर गुरूने नाकारले तरी शिष्य मिळवू शकतो ही समर्पणाची ताकद आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘एकलव्य’! त्याने निश्चर्यपूर्णक समर्पणातूनच ज्ञानप्राप्ती केली. माझ्यापेक्षा दुसरा मोठा असूच शकणार नाही, म्हणून दुसर्‍याचे बोलणे ऐकण्यात काय अर्थ आहे, इथे अहंकारातून प्रतिकार निर्माण होतो व ज्ञानाची साखळी खंडीत होते. म्हणून ‘गुरू’ या शब्दाचा वैज्ञानिक व ज्ञानसंपन्न अर्थ प्रत्येकाने घेतला पाहिजे, तो म्हणजे ‘ज्ञानी विषमता’. दोघांच्या ज्ञानात फरक असल्याशिवाय देण्याची व घेण्याची प्रक्रिया होत नाही. या अर्थाने ज्ञानी विषमता म्हणजे गुरू होय. या दृष्टीने प्रत्येकाने एवढे म्हटले पाहिजे की, या बाबतीत हा मोठा आहे. त्या बाबतीत तो मोठा आहे, असा विचार स्वीकारला तर आपण सोडून इतर सर्वच कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपले गुरू असतात. ‘ज्ञान वसे ठाई ठाई – अवघी सृष्टी गुरूमाई’ या वचनाचा अर्थ तोच आहे.
नाथ संप्रदायाची गुरूपरंपरा महत्त्वाची आहे. दत्त संप्रदायातील गुरुदत्तांना २४ गुरू होते. प्रत्येकाकडील गुण हा त्या क्षमतेला दत्तगुरूंचा गुरू होता. मानवी जीवनाची जडण-घडण यात गुरूचे स्थान हे असाधारण आहे, तर मनावी जीवनाच्या खर्‍याखुर्‍या सार्थकतेत सद्गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. जीवन जगताना दररोजच्या व्यवहारात आपल्याला अनेक गुरू भेटतात. जीवन मौजमजेत, आनंदात, सुखात जगायला पैसा लागतो. त्यासाठी नोकरी व्यवसायासाठी काय करावे, कसे करावे याचे अचूक ज्ञान घ्यावे लागते. ते तसे ज्ञान देणारे सहकारी, मित्र, अधिकारी मार्गदर्शक हेही आपले गुरूच असतात. अशा व्यावहारिक, प्रापंचिक, गुरूजनांबरोबरच जीवनात सद्गुरूही भेटायला हवा.
व्यावहारिक गुरू हे वस्तुजन्य सुखाची वाट दाखवतात, तर सद्गुरू मात्र शिष्याला त्याच्याच अंतःकरणात वास करणार्‍या त्या चैतन्याची ओळख करून देतात. आत्मविश्वासपूर्वक स्वशक्तीनुसार जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखवतात. समर्थ रामदासांनी सद्गुरूचे मुख्य लक्षत सांगताना म्हटले आहे.
‘मुख्य सद्गुरूचे लक्षण ।  आधी पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचे समाधान ।  स्वरूपस्थिती ।।
अशा या ज्ञानसंपन्न निश्चयी सद्गुरूंचे अनेक प्रकार पाडतात. अनुग्रह गुरू, कच्छप गुरू, क्रौंच गुरू,चंदन गुरू, चंद्रगुरू, दर्पण गुरू, धातुवादी गुरू, नादधिनी, छायानिधी, परीस गुरू, विचार गुरू, सूर्यकांत. अनुग्रह गुरू हा आपल्या सत्शिष्यांवर अशी कृपा करतात की त्याच्या चित्तावर विवेक-विचारांचा संस्कार होतो.  कासवी ज्याप्रमाणे आपल्या दृष्टीने पिलाचे पोषण करते तसे कच्छप गुरू शिष्याचे दृष्टीने पोषण करतात. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना आपले अवघे सामर्थ्य याच पद्धतीने समर्पित केले. क्रौंच पक्षीण अंडी घातल्यावर निघून जाते. मात्र, दूरवरून ती अंड्याचे व पिलांचे रक्षण करते. क्रौंच गुरू अशीच आपल्या शिष्यांवर कृपा करीत असतो. चंदन ज्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात येणार्‍याला सुगंधित करते, त्याप्रमाणे चंदनगुरू आपल्या सद्गुणांचा सुगंध शिष्याला प्रदान करतो. चंद्र लांब असूनही त्याच्यामुळे सागराला जशी भरती येते तशी या सद्गुरूंच्या अस्तित्वाने शिष्यांना सद्गुण भरती येते. आरशात जसे आपले प्रतिबिंब दिसते, तसा शिष्य सद्गुरूंचे प्रतिबिंब होतो, दर्पण गुरूंच्या साह्याने. धातूवादी, नादनिधी व छायानिधी गुरू हे उपासना, नाद आणि सावली (सान्निध्य) यातून शिष्यास गुरूपदापर्यंत नेण्याच्या अवस्था गुरूंचे प्रकार होत.  परीस ज्याप्रमाणे संपर्कात आलेल्या लोखंडाचे सोने करतो, तसेच परीस गुरूचे कार्य होय. विचार गुरू हे सार-असार यांचा विवेक, विचार देऊन शिष्यास आत्मज्ञान देतात. सूर्यकिरण हे ज्ञानकण आहेत. प्रकाशाच्या कणाकणांत ज्ञानाचा साठा भरून राहिला आहे. सूर्यकांत गुरूच्या विचारात व्यवहारात, सद्गुणात शिष्याच्या सद्वृत्ती विकसित करण्याची क्षमता असते. गुरू व सद्गुरूंचे अस्तित्व ही बाब जेवढी महत्त्वाची तितकीच आपली नम्रता व अहंकारशून्यताही महत्त्वाची  आपण थोडी नम्रता अहंकार मुक्तही झाले पाहिजे. या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनात नम्रतेचे पाऊल पडो व आपल्या जीवनातही ज्ञानरूपी सद्गुरूने आमूलाग्र बदल घडो, हीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment