तुम्ही गुरुदत्तचे चाहते असाल तर नसरीन मुन्नी कबीर निर्मित ‘इन सर्च ऑफ गुरुदत्त’ या डॉक्युमेंटरीची डीव्हीडी तुमच्या संग्रही असायलाच हवी. (गुरुदत्तचे चाहते नसाल तरी सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ती आवडेल यात शंका नाही.) नसरीन मुन्नी कबीर या लंडनस्थित लेखिका आणि लघुपटनिर्मात्या आहेत.
यापूर्वी त्यांनी ‘लता मंगेशकर इन हर ओन व्हॉईस’, ‘इनर अॅँड आऊटर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ यासारख्या डॉक्युमेंटरी बनविल्या असून गुरुदत्तवरील स्वतंत्र पुस्तकाबरोबरच ‘मुग़ल-ए-आझम’च्या उर्दू संवादाच्या पुस्तकाचीही निर्मिती केली आहे. गुरुदत्तवरील ही ८५ मिनिटांची डॉक्युमेंटरी लंडनच्या ‘चॅनेल फोर’ या टीव्हीकरिता त्यांनी १९८९ मध्ये बनविली होती. चार-पाच वर्षांच्या अथक परिश्रमांनी तयार झालेल्या या डॉक्युमेंटरीत गुरुदत्त या मनस्वी कलावंताचा एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून झालेला प्रवास, उण्यापुऱ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यानं केलेली कामगिरी, भारतीय चित्रमाध्यमाला त्यानं दिलेलं नवं परिमाण यांचा वेध घेतला गेलाय. जुन्या चित्रपटांतल्या काही दृश्यांबरोबरच गुरुदत्त यांच्या सहवासात आलेल्या अनेक कलावंतांच्या मुलाखतींमधून हा प्रवास उलगडतो. गुरुदत्तच्या आई वासंती पदुकोण, बहीण ललिता लाजमी, दिग्दर्शक भाऊ आत्माराम यांच्याबरोबरच देव आनंद, राज खोसला, अब्रार अल्वी, जॉनी वॉकर, वहिदा रहमान, मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी, व्ही. के. मूर्ती आदींच्या मुलाखतींमधून गुरुदत्तच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे न्याहाळायला मिळतात. ‘गुरुदत्त बहुत कुछ दे सकते थे, मगर वक्त से पहले वो चले गये थे’ हे मजरूह यांचं मनोगत स्पर्शून जातं. ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ या गाण्याच्या निर्मितीवेळचा कैफी आझमींनी सांगितलेला अनुभव आणि हे गाणं चित्रीकरणावेळी साधलेल्या दृश्यात्मक ‘चमत्कारा’ची फाळके पुरस्कारप्राप्त कॅमेरामन व्ही. के. मूर्तीनी सांगितलेली आठवण हे सारे प्रत्यक्ष अनुभवण्याजोगेच! शेमारू कंपनीनं सादर केलेल्या या डीव्हीडीसोबत गुरुदत्तवरील एक आकर्षक पुस्तिकाही उपलब्ध करून दिली असून त्यात या कलावंताच्या समग्र चित्रपटसूचीबरोबरच अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे. अवश्य संग्रही ठेवण्याजोगी कलाकृती!
|
No comments:
Post a Comment